पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला   

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील परिस्थिती बिकट होत आहे. सिंध, पंजाबसह संपूर्ण पाकिस्तानात पाण्यावरून वाद पेटला आहे. स्थानिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरून निषेध करू लागले. सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांच्या घरावर निदर्शकांनी हल्ला केला आहे. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या घरालाही आग लावली.
 
पंजाब आणि सिंधमध्ये पाणी वाटपावरून हिंसाचार उसळला. जमावाने गृहमंत्र्यांच्या घराला लक्ष्य केले. गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला करणारे निदर्शक बंदुका घेऊन आले होते. संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. उष्णता वाढली असल्याने पाण्याची समस्याही वाढली आहे. पाण्यावरून सुरू असलेला वाद आता खूप वाढला आहे.

सिंधमध्ये निदर्शने 

पाकिस्तानच्या प्रसार माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, नौशहरो फिरोज जिल्ह्यातील मोरो तालुक्यात पोलिस आणि निदर्शकांमध्ये भीषण संघर्ष झाला. यात दोन निदर्शक ठार झाले, तर बरेच जण जखमी झाले. सहा कालवे आणि कॉर्पोरेट, शेती प्रकल्पांविरुद्ध हा निषेध पुकारण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गावर धरणे आंदोलन करणार्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे समोर आले आहे.

आंदोलक आक्रमक

संतप्त निदर्शकांनी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांच्या घराची तोडफोड करत त्यांच्या घराला आग लावली. गृहमंत्र्यांचे रक्षक आले तेव्हा निदर्शकांनी त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार सुरू केला. आंदोलकांनी दरोडाही घातला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या मालमोटारींनाही आग लावण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
 

Related Articles